सावरकरांचा अपमान करु नका   

 

सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना फटकारले
 
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने   तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही राजकारणी आहात, अशी बेजबाबदार विधाने करू नका. अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशा शब्दात न्यायालयाने राहुल यांना खडसावले. 
 
राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यातील एका सभेत सावरकरांविषयी आक्षेपार्ह व्यक्त केले होते. सावरकरांना ब्रिटिशांचे नोकर असे संबोधत ते ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेत होते, असे  त्यांनी म्हटले होते. त्यावरून वादंग उठले होते. राहुल यांच्याविरोधात विरोधकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर राहुल यांनी या विधानातून द्वेष पसरवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले होते. 
 
दरम्यान, सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये राहुल गांधी यांच्याविरूद्धचे समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्याला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 
 
त्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने कठोर शब्दांत राहुल यांचा समाचार घेतला. स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नका, पुन्हा असे वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 

Related Articles